मुंबईला जाण्याअगोदर बदलीचा आदेश येईल   

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आयुक्तांना दम

पुणे : बाणेर येथे टाटा ग्रुपच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व फंडातून १६५ कोटी आले असून यामधून कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार आहे. याबाबतची सद्यःस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिका आयुक्तांना विचारली यावर पालिका आयुक्त यांनी या जागेवरील राडारोडा काढून जागा मोकळी झाली नसल्याचे सांगितले. एकूणच प्रकल्पाला होत असलेल्या विलंबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उघड नाराजी व्यक्त केली. 
 
ते म्हणाले की, निधी दिला, सूचना दिल्या, तरी कामे होत नाहीत, तुम्ही ३१ मे रोजी निवृत्त होणार आहे ना. तरी देखील तुमची बदली करेन, मी येथून मुंबईला जाण्या अगोदर तुमच्या बदलीचा आदेश आला असेल, अशा शब्दात पवार यांनी पालिका आयुक्तांना बदलीचाच इशारा दिला. पर्वती जलशुद्धीकरण केंद्राजवळील शासन आणि महापालिकेच्या मालकीच्या प्लॉटवर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा ठेऊन जागा बळकाविण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातून होणारी पाण्याची गळती दुरुस्त करता येत नाही. 
 
यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या विषयावरून महापालिकेला पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. हा मुद्दा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उपस्थित केला. गेल्या दोन वर्षापासून याचा पाठपुरावा आपण करीत असून तुम्ही सूचना देऊन देखील महापालिका प्रशासन कारवाई करीत नसल्याचे मिसाळ यांनी यावेळी सांगितले. तेव्हा संतापलेल्या पवार यांनी महापालिका प्रशासनाला या विषयांबरोबरच बाणेर येथे टाटा ग्रुपच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व फंडातून दिलेले १६५ कोटी रुपये आणि भिडे वाडा स्मारकासाठी महापालिकेच्या उपलब्ध करून दिलेल्या २०० कोटी रुपयांच्या निधीवरून धारेवर धरले.
 
अतिक्रमणाच्या मुद्यावरून बोलताना पवार म्हणाले, वेळीच लक्ष घातले पाहिजे. पुढे जाऊन ते भावनिक मुद्दा होतो. त्याचे पडसाद मग राज्यभर उमटतात. कायदा-सुवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही जबाबदार अधिकारी आहात, गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे. मुख्यमंत्री, मी आणि एकनाथ शिंदे यांनी सांगून सुद्धा महापालिकेकडून बाणेर येथील जागेवरील राडारोडा उचलला नाही. त्यामुळे फुकट निधी मिळत असूनही प्रकल्प मार्गी लागत नाही. मग त्याचा फायदा काय, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तीन दिवसात त्या जागेवरील राडारोडा उचला. तीन दिवसानंतर सकाळीच सात वाजता येऊन मी प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहे, असा इशाराही पवार यांनी दिला.

Related Articles